जाणीव विकासासाठी शेती आधारीत जीवनशैली – भाग २

नमस्कार
तर मी मागील लेखात म्हंटल्याप्रमाणे शेती आधारित जीवनशैलीच्या विविध पैलूंवर आपल्याशी संवाद साधणार आहे. त्याचाच भाग म्हणून मी-आम्ही काय करतो हे सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो.
आम्ही सेंद्रिय शेती व सोबत ग्रामउद्योग आधारीत जीवनशैली जगत आहोत. मूळचे आम्ही मराठवाड्यातील परळी(वैजनाथ) येथील आहोत.म्हणजे 400 किलोमीटर वरुन आम्ही इकडे आलो.
माझे बाबा श्री.वसंतराव देशपांडे हे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड (M S E B) मधून Divisional Accountant म्हणून रिटायर झाले. आई गृहिणी आहे.
मी स्वतः मेकॅनिकल इंजिनिअर आहे. पण तरीही आम्ही ठरवून सेंद्रिय शेती आधारित जीवनशैलीची वाट निवडली. ही जीवनशैलीच्या वाटेमागील पार्श्वभूमी व भूमिका पुढील लेखात.
तर आम्ही वर्धेपासून 25 किमी वर आमगाव (मदनी) या ठिकाणी शेतातच घर बांधून राहात आहोत. हे घरही मातीचे चार वर्षांपूर्वी बांधलेले आहे. त्याविषयी एखाद्या लेखात.
आमची एकूण 5 एकर शेती आहे. संपूर्ण शेती सेंद्रिय (Organic) पद्धतीने करतो.कोणतेही रासायनिक खत नाही, कोणतेही रासायनिक कीटकनाशक नाही, कोणतेही तणनाशक नाही. शक्यतो कोणतेही बाजाराचे बियाणे नाही. सेंद्रिय खतही बाजारातून विकत आणत नाही. शेणखत घेतो. त्यासोबत अमृतपाणी(जीवामृत) वापरतो. पीक फेरपालट करतो.
एका परिवाराचे स्वावलंबन होईल या पद्धतीने पिकांचे नियोजन असते. त्यामुळे एका सिझन ला शेतामध्ये कमीतकमी 20-25 प्रकारचे पिके असतात. यासाठी मिश्रपीक, आंतरपीक, सापळा पिक पद्धतीचा वापर करतो.
शेतातून वर्षभरात
मूग,उडीद,तूर,चना अशा 4 प्रकारच्या डाळी
भुईमूग, तीळ, जवस अशा 3 प्रकारच्या तेलबिया
मका, ज्वारी, बाजरी, गहू असे 4 प्रकारचे धान्य
हळद, मिरची, मोहरी, धने, अद्रक, ई प्रकारचे मसाले आणि मौसमी सर्व प्रकारच्या भाज्या (म्हणजे पावसाळ्यात भेंडी, गवार व सर्व प्रकारच्या वेलवर्गीय आणि हिवाळ्यात सर्व प्रकारच्या पालेभाज्या ई) होतात.
यासोबत शेतात विविध मोसमात येणाऱ्या फळझाडांची लागवड केलेली आहे-करत आहे.
यादृष्टीने खाण्यातील वैविध्य व पौष्टिकता ही आमची एक प्रकारची श्रीमंती(Richness) आहे. ती आरोग्यदायी आहे.
या विविधतेत कोणी आम्हाला सहकार्य करणार असेल तर आम्हाला आवडेल.
यासोबत आम्ही उद्योग ही करतो. त्याबद्दल पुढील लेखात…


मंदार देशपांडे
9420415648
mandar9999@gmail.com
