जाणीव विकासासाठी शेती आधारित जीवनशैली भाग – ५

Date: July 18th, 2019 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Agriculture, Bhartiya Sanskriti, Business Management, General Knowledge, Geography, History, Latest News, Wardha
जाणीव विकासासाठी शेती आधारित जीवनशैली भाग – ५

नमस्कार

सर्वप्रथम माफी की मी मागील लेख लिहू शकलो नाही.
शेतीची कामे, पाऊस पडल्याने पेरणी या धांदलीत लिहणे जमले नाही.
क्षमस्व!
 
खरेतर आत्ताही पाऊस नाहीये. पिकांची परिस्थिती बरी आहे पण पुढील आठवड्याभरात पाऊस हवा आहे अन्यथा अवघड परिस्थिती होईल. ज्यांची जमीन हलकी व कोरडवाहू आहे त्यांचे अजूनच अवघड आहे. रासायनिक खते वापरल्याने ज्यांच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब(Organic Carbon) कमी झालाय त्यांचे अशा पावसाच्या उघडीप मध्ये अवघड आहे. कारण सेंद्रिय कर्ब हा मातीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढवतो. आणि त्यासाठी शेतातील काडी कचरा शेतात मुरवणे आवश्यक आहे, पीक विविधता ही आवश्यक आहे. हे आज होतं नाहीये.
 
हे तुम्हाला सांगायचे कारण हेच की आजच्या विकासाच्या संकल्पने मध्ये पैशाला अधिक महत्व आल्याने शेतकरी ही अधिक पैसा कमवण्याच्या मागे आहे जे की स्वाभाविक आहे. पण त्या नादात नगदी पिके (Cash Crops), रासायनिक खते, एकल पीक(Single Crop) पद्धती, अति पाणी वापर, झाडाची तोड यामुळे वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत ज्याचे परिणाम शेतकऱ्याना आणि ग्राहक म्हणून आपल्यालाही भोगावे लागतील, लागत आहेत. म्हणून ग्राहक म्हणून आपणही याचा विचार करायला हवा. हे पटणे अवघड आहे पण त्याची गरज आहे.
 
विकासाच्या संकल्पनेचा विचार होण्याची गरज आहे. GDP आधारित विकास हा एकलकोंडी होत आहे. निर्माण होणाऱ्या समस्या आपण वरवर सोडवत आहोत, shift करत आहोत.त्यातून दुसऱ्या वेगळ्याच समस्या निर्माण होत आहेत. मुळात जाऊन समस्या सोडवल्या शिवाय समस्या संपणार नाहीत.
 
ह्याचे उत्तम उदाहरण सध्याची पाणी समस्या आहे. मागचे अनेक दशकं आपण पाण्याचा उपसा वाढवत आलो. पण जमिनीत पाणी मुरवण्याचा काहीही उपाय केला नाही. पावसाचं पडणार पाणी आपोआप जमिनीत मुरतं असंच कदाचित आपण मानून घेतलं.
 
कल्याणकारी राज्य(Welfare State) असे आपण म्हंटल्याने आम्ही तुमचे कल्याण करणार, प्रश्न सोडवणार असे राज्यकर्त्यांनी मानले. पाण्याच्या बाबतीत, प्रत्येक घराला पाणी पुरवण्याची जबाबदारी आमची असे शासनाने म्हंटल्याने आपण त्यांच्यावर विसंबून राहिलो. टँकर द्वारे त्यांनी ते करण्याचा अपुरा प्रयत्न केलाही, करत आहेत. टँकर हा झाला वरचा उपाय, तो ही गरजेचा आहे पण मुळात प्रश्न सोडवण्यासाठी काय केले याचे उत्तर फार काही नाही असेच आहे. शासनाने ही असेच मानले की पडणारा पाऊस आपोआप जमिनीत मुरतो. पण तसे होतं नाही.
पडणाऱ्या पावसाचे चार भागात विभाजन होते.
1.जमिनीतील ओलावा 15%
2.बाष्पीभवन 25%
3.जमिनीत मुरणारे पाणी म्हणजे भूजल 30%
4.वाहून जाणारे पाणी 30%
 
म्हणजे जमिनीत मुरणारे पाणी फक्त 30% आहे.
बाष्पभवनाचे आपण काहीही करु शकत नाही. उलट तापमानात वाढ होत असल्याने ते वाढत आहे. त्यामुळे जमिनीवर पाण्याची साठवणूक म्हणजे तलाव, धरण ह्यापेक्षा जमिनीतील पाण्याची पातळी म्हणजे भूजल वाढणं हे जास्त आवश्यक आहे.
जमिनीतील ओलावा हाही पिकांसाठी ठीक आहे पण त्याने भूजल वाढणार नाही. आणि वर लिहल्याप्रमाणे ओलावा वाढण्यासाठीचा सेंद्रिय कर्ब कमी होतं जातोय.
 
तर मग उरते वाहून जाणारे पाण्यासाठी जलसंधारणाचे उपाय करणे. जेथे पडला तेथेच पाण्याचा थेंब अडवून जमिनीत मुरण्याची व्यवस्था करणे.
 
आता हे करणार कोण??
शासन हे करु शकत नाही. शासन यासाठी पूरक व्यवस्था निर्माण करु शकते.पण काम आपल्यालाच  करावे लागेल.
शहरात हे काम आपण सिमेंटचे रस्ते, सिमेंट च्या नाल्या, पेव्हर ब्लॉक्स लावून, अंगण(असल्यास) फरशीचे बनवून अवघड करत आहोत. मग आता हे काम करण्याची जास्त जागा उरली ती गावात. तेही करत नाहीत कारण जगण्याच्या पद्धतीत आपण निसर्गाला गृहीत धरुन चाललोय.
तरीही पाणी फाऊंडेशन च्या वॉटर कप स्पर्ध्येमुळे मागील 4 वर्षात महाराष्ट्रात अनेक गावांत जलसंधारणाचे उपचार झाले. शासनाने ही जलयुक्त शिवार योजनेतून अनेक कामे केली.
 
पण पाण्याच्या वापरावर अजून कोणीही बोलतांना दिसत नाही.
पाणी मुरवण्याच्या वेगापेक्षा वापराचा वेग जास्त आहे त्यामुळे भूजल वाढणे कसे शक्य होणार?
 
आणि हे सगळे विकासाच्या संकल्पनेशी जोडलेले आहे. अधिक उत्पादन अधिक उपभोग अधिक विकास, निसर्ग हा मानवाच्या उपभोगासाठी या संकल्पनेमुळे हे सर्व घडत आहे. म्हणून ह्या संकल्पनेतील फोलपणा समजून घेण्याची गरज आहे. वरवर उपाय योजना करुन फार काही होणार नाही. मुळात घाव घालण्याची गरज आहे.
 
विकासाच्या संकल्पनेला समजून घेऊन आम्ही आमची जगण्याची पद्धती बदलली
ती कशी ते पुढील लेखातून समजून घेऊ
 
मंदार देशपांडे
9420415648
mandar9999@gmail.com

Recent Post

Blog Archive

Swastik Swastik